“चौक”
आलोक धन्वा
मराठी अनुवाद - पृथ्वीराज तौर
त्या स्त्रियांचं देणं माझ्यासोबत आलं
ज्यांनी मला चौक ओलांडायला शिकवलं
माझ्या गल्लीतच राहायच्या त्या
पहाटेच कामावर निघायच्या
माझी शाळा त्यांच्या रस्त्यातच होती
आई करायची मला त्यांच्या हवाली
सुट्टी झाल्यावर मी त्यांची वाट बघायचो
त्यांनी मला वाट बघायला शिकवलं.
गावच्या शाळेत
मी पहिल्यांदाच दाखल झालो होतो
काही दिवसांनी
स्वतःच जाऊ लागलो मी
आणि त्यानंतर काही दिवसांनी
कित्तीतरी मुलांशी दोस्ती झाली माझी
मग आम्ही सोबत सोबत
इतरही अनेक रस्त्यांनी शाळेत येऊ जाऊ लागलो.
पण अजूनही
त्या थोड्याशा दिवसांच्या कित्तेक दशकांनंतरही
जेंव्हा कधी मी एखाद्या मोठ्या शहरात
एखाद्या गर्दीभरल्या चौकातून जातो
त्या स्त्रियांची आठवण येते मला
आणि मी आपला उजवा हात त्यांच्याकडे पुढे करतो
आणि डाव्या हाताने खापराची ती पाटी सांभाळतो,
जी मी सोडून आलोय
वर्षांअगोदरच्या वर्तमानात
Saturday, July 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment